मुख्य बातमी

जानेवारीत चार दिवसांच्या सागर महोत्सवाचे आयोजन

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन व सहयोगी संस्थांतर्फे नियोजन

रत्नागिरी : आसमंत बेनवोलन्सच्या वतीने आसमंत सागर महोत्सव ९ ते १२ जानेवारी २०२५ असे चार दिवस साजरा होणार आहे. महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष असून, यावर्षीच्या कार्यक्रमात वैविध्य असणार आहे, अशी माहिती आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे नंदकुमार पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी या सागर महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, मानवी उत्क्रांतीत सागरांचे महत्त्व अपार आहे. आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यात ही सागरांचे मोठे योगदान आहे. सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे, आणि त्यातून संवर्धन कार्याची प्रेरणा देणे, याच ध्येयातून तीन वर्षांपूर्वी सागर महोत्सव सुरू झाला. गेल्या दोन वर्षांत सुमारे १० हजार लोकांपर्यंत आम्ही पोचलो, त्यातून अनेक शाळा-कॉलेजनी प्रेरणा घेऊन कामे हाती घेतली, यातच आम्ही यश मानतो.

भारतासाठी ब्लू (नील) अर्थव्यवस्था म्हणजे महासागर आणि सागरी परिसंस्थांशी संबंधित अनेक आर्थिक संधी, जी उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लाखो नोकऱ्या उपलब्ध करून देणारी आणि आणखी अनेक संधी निर्माण करणारी काही प्रमुख क्षेत्रे म्हणजे मत्स्यपालन, शिपिंग, पर्यटन, खोल समुद्रातील खाणकाम, ऑफशोअर ऊर्जा संसाधने, सागरी संशोधन, महासागर संवर्धन आणि महासागर विज्ञान यासह महासागर आधारित क्षेत्रे आहेत. १२ प्रमुख आणि २०० लहान बंदरांसह नऊ किनारी राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशामध्ये पसरलेल्या ७५०० किमी लांबीच्या किनारपट्टीसह, भारताची निळी अर्थव्यवस्था देशाच्या ९५ टक्के व्यवसायाला वाहतुकीद्वारे समर्थन देते आणि त्यात मोठे योगदान देते. त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) अंदाजे ४ टक्के योगदान आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्यउत्पादक आणि मत्स्यपालन मासे उत्पादक देश आहे. पुढील काही दशकं ही निळी अर्थव्यवस्था आपल्याला तारून नेईल.

या सागराशी मैत्री साधत आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी गेली दोन वर्षाहून अधिक प्रयत्न करत आहे. सागर आणि त्याच्या भोवती असलेल्या परिसंस्थेचे जतन महत्त्वाचे आहे. सागर महोत्सवामध्ये गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालाय, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (गोवा), गोखले इन्स्टिट्यूट, सेंटर फॉर ससस्टेनेबल डेव्हलपमेंट (पुणे), इकॉलॉजिकल सोसायटी (पुणे), कोस्टल कॉन्झर्वेशन फौंडेशन (मुंबई) यांचा तांत्रिक सहभाग असणार आहे. आसमंतचे सागर आणि परिसंस्थेचे संशोधनात्मक कामही लवकरच सुरू होणार आहे. या आधी आसमंत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयानी कोस्टल मॅपिंगचे काम पूर्ण केले आहे. या वर्षी नौदलाच्या युद्ध नौकांचे प्रदर्शन असणार आहे, असे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button