महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

गोदामाईच्या साक्षीने श्रद्धेचा महासंगम; सिंहस्थातून जगाला एकात्मता अन् पर्यावरण रक्षणाचा संदेश – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१४०० वर्षांची श्रद्धापरंपरा, आधुनिकतेचा नवा अध्याय; सिंहस्थ कुंभपर्वातून सामाजिक ऐक्याचा जागर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान राखून मदतीचा विश्वास; गोदावरीच्या महाआरतीत सहभागी झाल्याचा विशेष आनंद – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नाशिक, : हजारो वर्षांच्या श्रद्धेचा वारसा…प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी…भगवान शंकराच्या सान्निध्याने पुनीत झालेले त्र्यंबकेश्वर आणि कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा अखंड प्रवाह असलेली गोदामाई! अशा पवित्र वातावरणात नाशिकच्या गोदातीरावर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश घुमला. सिंहस्थ कुंभपर्व हे केवळ धार्मिक आयोजन नसून भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा उत्सव आहे. या श्रद्धेच्या महासंगमाला पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि आधुनिकतेची जोड देऊन आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त गोदाघाटावर आयोजित महागोदा आरती कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. यावेळी त्यांनी व इतर मान्यवरांनी गोदापूजन केले. ‘पवित्र नाशिक नगरीला माझा नमस्कार’ अशा मराठी शब्दांत भाषणाची सुरुवात करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येण्याचा विशेष आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वूईके, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे साधू-महंत, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

‘महाराष्ट्राची भूमी ही अमृतभूमी आहे. या पावन भूमीला मी कोटी कोटी प्रणाम करते,’ अशा शब्दांत राष्ट्रपतींनी महाराष्ट्राविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाने कृतार्थ झाल्याचे सांगताना भगवान शंकराचे पावन सान्निध्य लाभलेली त्र्यंबकेश्वरची भूमी, प्रभू श्रीरामांच्या वनवासाच्या स्मृती जपणारी नाशिकची तपोभूमी आणि सर्वांना आशीर्वाद देणारी गोदावरी नदी यांचे आध्यात्मिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. गोदावरीच्या महाआरतीत सहभागी होण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

भारतात धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्यांची प्राचीन परंपरा असून सुमारे १४०० वर्षांपूर्वीही लोक मोठ्या श्रद्धेने अशा आयोजनांमध्ये सहभागी होत असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आढळतात, असे राष्ट्रपतींनी सांगितले. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; मात्र भारतीयांच्या मनातील श्रद्धेचा प्रवाह अखंड राहिला आहे. कुंभपर्व हे केवळ आस्थेचे प्रतीक नसून सामाजिक एकात्मता आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देणारे पर्व आहे. आगामी सिंहस्थ कुंभपर्वाला आधुनिकतेचे नवे आयाम जोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करताना राष्ट्रपतींनी नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान, अभिनव भारतची क्रांतिकारी परंपरा, गोदावरीचे उगमस्थान तसेच चाफेकर बंधू आणि दादासाहेब पोतनीस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले. महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्राने देशाला सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाची दिशा दिल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील ६५० गावांमधील सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधव सहभागी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी विशेष आनंद व्यक्त केला. हा सहभाग भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत वेगाने प्रगती करत असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार चांगले कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा संवेदनशीलतेने उल्लेख करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपत केंद्र व राज्य सरकार त्यांना आवश्यक मदत करेल. संकटाच्या काळात अन्नदाता शेतकऱ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी देशवासीयांना पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले. नद्या, जलस्रोत आणि नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्याबरोबरच स्वच्छता आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. श्रद्धेसोबत पर्यावरणाविषयीची जबाबदारीही प्रत्येकाने जपावी, असा संदेश त्यांनी दिला.

अध्यात्मासोबत सामाजिक एकात्मता, परंपरेसोबत आधुनिकता आणि श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम आगामी सिंहस्थ कुंभपर्वातून घडेल, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२७ साठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

गोदामाईच्या कृपेने दुष्काळाचे सावट दूर होवो; महाराष्ट्र पुन्हा सुजलाम् सुफलाम् होवो! – राज्यपाल जिष्णु देव वर्मा 

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. सिंहस्थ कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असून, जात-पात, धर्म किंवा सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांना अध्यात्माच्या धाग्याने जोडणारा श्रद्धेचा महासंगम असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकची भूमी आणि गोदावरी नदीचे अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ऐतिहासिक आणि भव्य आयोजन महाराष्ट्र शासन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी गोदावरीच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना ‘गोदामाईच्या कृपेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होवो, बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो आणि महाराष्ट्राची भूमी पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् होवो,’ अशी भावपूर्ण प्रार्थना राज्यपाल वर्मा यांनी गोदाकाठी केली.

भारतीय संस्कृतीच्या महासंगमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट घडवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपली सनातन संस्कृती अनादी आणि अनंत आहे. अथांग सागराप्रमाणे असलेल्या या संस्कृतीच्या विविध अभिव्यक्ती आणि आविष्कारांचा महासंगम म्हणजे कुंभपर्व आहे. गंगा-गोदावरीच्या पवित्र स्नानाची परंपरा जपणारा कुंभमेळा हा केवळ भारताचाच नव्हे, तर जगभरातील भाविकांच्या आस्थेचा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरीच्या महागोदा आरतीसाठी ६ हजार ५०० आदिवासी बांधव सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सनातन संस्कृतीच्या जतनात आदिवासी जनजातींचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य, दिव्य आणि सुंदर करण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील विकासकामे प्रत्यक्षात साकारत आहेत. शासनाची भूमिका सुविधा निर्माण करण्याची असून या कुंभपर्वाचे खरे मालक साधू-महंत आहेत. शासन-प्रशासनाकडून काही चूक झाली, तर संत-महंतांनी मोठ्या मनाने क्षमा करावी,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक सोहळ्यासाठी नाशिककरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहून पवित्र ध्वजारोहण केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना धन्यवाद दिले.

सिंहस्थातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागतिक जागर; ३५ हजार कोटींच्या विकासातून नाशिक-त्र्यंबकेश्वरला नवी झळाळी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आगामी सिंहस्थासाठी जगभरातून सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज असून त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र शासन सज्ज झाले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता या परिसराच्या भविष्याला नवी दिशा देतील. संत-महंत आणि भाविकांसोबतच सामान्य कष्टकऱ्यांच्या हाताला काम देणारा, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा हा आर्थिक महोत्सवही ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या या सिंहस्थाला प्रभू श्रीरामाचे कृपाछत्र आणि गोदामाईचा आशीर्वाद लाभेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा, नारीशक्तीच्या सन्मानाचा आणि सामाजिक एकात्मतेचा जागतिक आविष्कार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकच्या रामतीर्थावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजारोहण होणे हा ऐतिहासिक सुवर्णक्षण असून, तपस्वी मातृशक्तीच्या हस्ते झालेला हा सोहळा संपूर्ण नारीशक्तीचा गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचे मूर्त स्वरूप या कुंभपर्वातून जगाला पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या गोदाआरती सोहळ्यास आमदार सुहास कांदे, गोकुळ गिते, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या कुंभगीत व संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ व त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे विमोचन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. हे विशेष टपाल तिकीट रामचंद्र जायभावे यांनी राष्ट्रपती महोदयांना सुपूर्द केले. या उपक्रमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा टपाल तिकिटांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button