बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (ता. २१) जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) या शिक्षण मंडळांच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बारावीचा निकाल यंदा वाढला आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा निकाल वाढणार की कमी होणार याबाबत उत्सुकता आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर २१ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे : १. mahresult.nic.in २. http://hscresult.mkcl.org ३. www.mahahsscboard.in ४. https://results.digilocker.gov.in ५. www.tv9marathi.com ६. http://results.targetpublications.org
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
या निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे : ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जून २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI Net Banking याद्वारे भरता येईल.
फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्र्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ ) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून (ता. २७) मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.



