कोकण पदवीधर मतदारसंघातील १३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

रत्नागिरी : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी (२६ जून) मतदानाची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत पार पडली असून, या मतदारसंघातील १३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत या मतदारसंघात आहे. मागील १२ वर्षे कोकणचे पदवीधर आमदार म्हणून कार्यरत असलेल्या निरंजन डावखरे यांच्याविरूद्ध राजकारणातील मुरब्बी, अनुभवी असे म्हाडाचे माजी सभापती, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी दंड थोपटले. मतदारसंघात दोन्हीही उमेदवारांनी मतदार नोंदणीसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. यामुळे ह्यावेळी मतदारांच्या संख्येत वाढ झाली होती; मात्र तरीही मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसत आहे.
दुपारपर्यंत जिल्ह्यात पदवीधर मतदारांनी उत्तम प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक रिंगणातील प्रमुख दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात, तर काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी रत्नागिरीत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ८ जार २७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर पुढील दोन तासांत ११ हजार २३६ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदारसंघात सर्वाधिक जास्त मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले होते. त्या पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यात ४९.५४ टक्के, पालघरमध्ये ४६.७७ टक्के, ठाणे ४५.५४ टक्के, रायगड ४८.५४ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असतानाही तसेच मतदान केंद्रे गावांपासून दूर असतानाही पदवीधर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्राबाहेर महायुती, महाविकास आघाडीचे बुथ लावण्यात आले होते. येथे दोन्हीही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. अखेरच्या तासाभरात शिल्लक राहिलेल्या मतदारांनी काही मतदानकेंद्रांवर गर्दी केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या खेड येथे एकत्र करण्यात आल्या. त्यानंतर रात्री उशिरा खेड येथून सर्व मतपेट्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर सील करून ठेवण्यात आल्या. या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलासह राज्य राखीव दलाची तुकडी, रायगड पोलिसांचे विशेष पथक परिसरात तैनात करण्यात येणार आहेत.



