मुख्य बातमी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत (दापोली) येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्य संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक यांच्या हस्ते झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तीन दिवसांत निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्य संवर्धनासाठी लागणारे तलाव कसे बांधावेत, तलावाची संवर्धनपूर्व तयारी कशी करावी, कोळंबी व मासे यांचे दर्जेदार बीज कसे ओळखावे, बीजाची वाहतूक, वन्नामेई कोळंबी संवर्धन, कोळंबी व मासे यांची वाढ कशी मोजावी, कोळंबी व मासे वाढल्यानंतर कसे पकडावे व चांगल्या स्थितीत बाजारात कसे न्यावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
बँक ऑफ इंडियाचे (रत्नागिरी) कृषी अधिकारी समाधान मोरे यांनी ‘बँकांच्या मत्स्यशेतीकरीता कर्ज योजना’ यावर मार्गदर्शन केले. मत्स्यशेतकरी रजनीश महागावकर यांनी बायोफ्लॉक तंत्रज्ञानद्वारे निमखारे कोळंबी व मत्स्य संवर्धन यावर स्वानुभव कथन केले. सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने व्यवसाय सुरू करण्यास उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदान योजनांची माहिती पुरविली. ‘कोळंबी व मत्स्यशेतीचे अर्थशास्त्र व आवश्यक प्रकल्प अहवल बनविणे’ यावर शिरगाव येथील मत्स्यमहाविद्यालयाचे विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. के. जे. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तर पनवेल (जि. रायगड) येथील खार जमीन संशोधन केंद्राचे विषयतज्ञ डॉ. शशिकांत मेश्राम यांनी ‘खाद्य व्यवस्थापन’ आणि डॉ. विवेक वर्तक यांनी ‘जिताडा मासे संवर्धन’ यावर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बाणखिंड (शिरगाव) येथे असलेल्या आदिष्टी ॲक्वा फार्मवर प्रशिक्षणार्थीनी प्रकल्प भेट दिली. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रकल्प आणि प्रात्याक्षिके अनुभवली. या मिळालेल्या संधीबद्दल प्रशिक्षणार्थिनी प्रकल्पाचे मालक वैभव खेडेकर आणि प्रकल्प व्यवस्थापक सुदेश मयेकर यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना त्यांनी ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन बहुतेक प्रशिक्षनार्थिनी निर्णय घेतला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि या प्रशिक्षण मध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून यश प्राप्त करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षणांर्थीनी आम्ही दिलेल्या प्रमाणपत्राच्या उपयोग शासकीय योजनांसाठी करण्याचे आवाहन करतानाच दिलेल्या ज्ञानाच्या उपयोग करून यशस्वी उद्योजक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना यशस्वी सहभागाबद्दल प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोकणातील विविध जिल्ह्यांतून विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button