माहेर संस्थेत उभारली पुस्तकांची गुढी

हातखंबा, रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये वर्षातील सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. माहेर संस्थेमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ, निराधार, मुले, मुली महिला व पुरुषांना कौटुंबिक वातावरणात सणाचा आनंद घेता यावा यासाठी सर्व जाती धर्माचे सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात.
यावर्षीचा माहेर संस्थेत गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या गुढीपाडव्यानिमित्त माहेर संस्थेमध्ये पुस्तकांची गुढी उभा करण्यात आली. संस्थेतील बालकांना पुस्तकांची ओळख व्हावी व वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालका सिस्टर लूसी कुरियन यांच्या प्रेरणेने व प्रकल्प प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाने गुढीपाडव्यानिमित्त एक तास वाचन हा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेतील सर्व मुले-मुली, महिला व पुरुषांनी या गुढीपाडव्याच्या सणात सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणीत केला.
या कार्यक्रमात संस्थेचे प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, सुनील कांबळे, अधिक्षिका शितल हिवराळे, विजया कांबळे, माधुरी पांचाळ, छाया दळवी, संध्या होम पुरुषांच्या विभागाचे इन्चार्ज वृषभ खडसे, राकेश भिल्ल, अमित चव्हाण, अर्चना भिल्ल उपस्थित होते.



