आकांक्षा कांबळे यांनी विणली चक्क दीड किलो चांदीची रोवळी
मुंबईतील मिस्त्री कुटुंबियांचा नवस : सासू पती आणि मुलगा यांच्या प्रोत्साहनामुळे आव्हान पूर्णत्वास

रत्नागिरी : फावल्या वेळेत बांबपासून सूप, रोवळी, परडी विणणाऱ्या रत्नागिरीतील महिलेने धातूपासून रोवळी तयार करण्याचे आव्हान स्वतःलाच दिले आणि सासू, पती आणि मुलगा यांच्या प्रोत्साहनामुळे ते अवघ्या सहा तासांत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले. आकांक्षा दिलीप कांबळे असे त्यांचे नाव असून त्यांनी नुकतीच चक्क दीड किलो वजनाची सुबक अशी रोवळी तयार केली आहे. ही रोवळी येत्या दत्त जयंतीला मुंबईतील मेस्त्री कुटुंबीयांकडून दत्त मंदिरात नवस म्हणून अर्पण केली जाणार आहे.

दत्ताचे भक्त असलेले मेस्त्री कुटुंबाने दत्त जयंतीनिमित्त दत्ताच्या देवळात चांदीच्या रोळीतून दिवा दाखवून असा नवस बोलला होता. इच्छित मनोरथ पूर्ण झाल्याने आता नवस फेडणे क्रमप्राप्त आहे हे लक्षात घेऊन मिस्त्री कुटुंबाने अनेक सोनारांची दुकाने पालथी घातली; मात्र अशा प्रकारचं काम कोणतेही सोनार घेत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. शोधाशोध करताना त्यांना कोकणात अशा प्रकारचे रोवळी बांबू पासून बनवली जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार ते शोध घे रत्नागिरी शहरातील रहाटाघर परिसरात बुरुड काम करणाऱ्या व्यावसायिकांकडे आले; मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. आजूबाजूला विचारपूस करताना त्यांना रत्नागिरी शहरापासून जवळच राहणाऱ्या शिरगाव-बौद्धवाडी येथील आकांक्षा दिलीप कांबळे यांची माहिती मिळाली. त्यानुसार ते शिरगाव बौद्धवाडी त्यांचा शोध घेत गेले. १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी आकांक्षा कांबळे यांना फोनवरून आपल्याला कशा पद्धतीची रोवळी हवी आहे याची कल्पना दिली.

आकांक्षा कांबळे या शिरगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत असून जिल्हा महिला परिचर संघटनेच्या त्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. फावल्या वेळेत त्या बुरुड काम करत असतात; मात्र धातूपासून रोवळी विणण्याचे मोठे आव्हान आकांक्षा यांच्यासमोर होते होते. मात्र सासू सुनीता कांबळे, पती दिलीप आणि मुलगा वंश यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबरला सकाळी ११.३० दरम्याने मेस्त्री यांच्या समक्ष मेस्त्री यांनी आणलेल्या चांदीच्या पट्ट्यांची पूजा करून त्या विणायला सुरुवात केली. सलग सहा तासानंतर म्हणजेच संध्याकाळी साडेपाचला त्यांनी सुबक अशी रोवळी तयार केली. ही रोवळी पाहून मिस्त्री कुटुंबीय ही खुश झाले.

“अशा पद्धतीची म्हणजे धातूपासून रोवळी आपण प्रथमच बनवली असून या आधी आपल्याला असा कोणताच अनुभव नव्हता; मात्र स्वतः स्वतःला आव्हान दिले आणि ते पूर्ण करू शकले याचे समाधान मला आहे, अशा प्रकारची पुन्हा संधी आल्यास आपण ती पूर्ण करू शकू असा आत्मविश्वास आता आपल्यात आला असल्याचे आकांक्षा कांबळे यांनी यावेळी सांगितले. एका अर्थाने आपल्या हातून देवाची सेवा घडल्याने त्याचे एक वेगळेच समाधान असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.




