“कोंकण दिनांक” इफेक्ट : रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यास सुरुवात

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर साप्ताहिक आणि वस्तुनिष्ठ बातम्यांमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेले न्यूज पोर्टल “कोंकण दिनांक”ने मा. जिल्हाधिकारी महोदय, आम्हाला खड्ड्यातून वाचवा हो!! – एक रत्नागिरीकर… या मथळ्याखाली स्फुट २३ जुलै रोजी लेख प्रसिद्ध केले आणि एकच गहजब उडाला. रत्नागिरीकरांच्या मनातील उसळून येणाऱ्या वेदनाच लेखामधून मांडल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. शहरातील अनेकांनी फोन करून “कोंकण दिनांक”चे आभार मानले.
“कोंकण दिनांक”च्या बातमीचा इफेक्ट इतका जबरदस्त होता की, खड्डे आणि रस्ते यांच्या दुर्दशेबद्दल काय बोलणार “आपलेच दात आणि आपलेच ओठ” या भूमिकेत असणारे सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यासाठी नगरपालिका कार्यालयावर पहिली धडक दिली. पाठोपाठ ‘उबाठा’, राष्ट्रवादी अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचे जाहीर केले. रत्नागिरीकरांच्या या जागरूकतेबद्दल त्यांचे विशेष आभार.
“कोंकण दिनांक” च्या लेखाची दखल घेऊन आज शहरातील मारूती मंदिर परिसरातील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांनीही वाहनचालकांनी रस्त्यातील खड्ड्यांपासून मुक्तता करा या मागणीसाठी आंदोलन केले. यामध्ये शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी गटाचा समावेश मोठ्या संख्येने होता. आज (२५ जुलै) रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांकडूनही आंदोलन छेडण्यात आले.
दरम्यान, पालिकेने मारुती मंदिर येथील रस्ता पेव्हर ब्लॉकने भरायला घेतला आहे. गेले कित्येक दिवस यात डबर ओतून तात्पुरती मलमपट्टी केली जात होती; मात्र मुसळधार पडणाऱ्या पावसात हे डबर पाण्यासोबत वाहून जात होते. परिणामी खड्डा राहून डबरमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. आज सकाळी हे खड्डे पेव्हर ब्लॉकने भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लवकरच रत्नागिरी खड्डेमुक्त होईल, अशी अपेक्षा रत्नागिरीकरांनी व्यक्त केली असून. अनेकांनी याबद्दल “कोंकण दिनांक”चे आभार मानले.



