कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार , विचारवंत ज्ञानेश महाराव रत्नागिरीत

रत्नागिरी : कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन २३ ऑगस्टला उद्घाटन होणार असून या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २४ ऑगस्ट रोजी प्रथितयश लेखक, संपादक, विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने रत्नागिरीकरांना प्रथमच त्यांचे आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर परखड विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.
कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि ४ दशकांची दीर्घ परंपरा या स्पर्धेला लाभली असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला आहे. ज्वलंत, निर्भिड विषय, पारदर्शक निकाल आदी वैशिष्ट्यांनी स्पर्धा राज्यभरात नावलौकिकाला आली आहे.
या वर्षी ही स्पर्धा येत्या २३ आणि २४ ऑगस्ट रोजी होत असून माध्यमिक गटाची स्पर्धा २३ रोजी, तर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटाची स्पर्धा २४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण लेखक, ज्येष्ठ पत्रकार चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांचे विचार ऐकण्याची सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा कार्यक्रम ४ वाजता एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात होणार आहे. या व्याख्याना नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले आहे.



