पावस येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

रत्नागिरी : मच्छिमारी व्यवसाय करताना मच्छिमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे आदी प्रसंगी प्राथमिक उपचार काय करावे याची शास्त्रीय माहिती मच्छिमारांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. याच हेतूने सागरी सुरक्षेचे महत्व ओळखून पावस येथील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन, नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांना नुकतेच सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, श्रीमती प्रणाली गोरे, रत्नागिरी नागरी संरक्षण केंद्राचे सहाय्यक उपनियंत्रक ए. एन. गधरी, योगेश पावसकर उपस्थित होते.
रत्नागिरीच्या नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक श्री. गधरी यांनी समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास, विजेचा धक्का लागल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासह समजावून सांगितल्या. तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासवासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दलही माहिती दिली.
त्याचप्रमाणे श्री. सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाची (कंट्रोल रूम) माहिती देऊन आपत्तीच्या वेळेस नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचे तसेच मासेमारीसाठी समुद्रात जाताना आवश्यक ती जीवरक्षक साधने सोबत घेऊन जावे असे केले. मच्छिमारांच्या वतीने संजय पावसकर यांनी उपस्थित मार्गदर्शकांचे आभार मानले.



