महावितरणची मार्चअखेर विक्रमी वसुली

रत्नागिरी : महावितरण कंपनीने थकबाकीधारकांच्या विरोधात कठोर पावले उचलली असून, महावितरणच्या वसुली पथकाने १०० कोटी ३३ लाखांची विक्रमी वसुली केली आहे. १११.२७ टक्के ही वसुली पूर्ण झाल्याने वरिष्ठांकडून महावितरणचे कौतुक करण्यात आले. ३१ मार्चअखेर जिल्ह्याला ९० कोटी १७ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते.
महावितरणकडून मागणीप्रमाणे वीजपुरवठा केला जातो. ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल देण्यात येत असले तरी ग्राहकांकडून ते वेळेवर भरले जात नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढू लागले आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी वसुली मोहीम तीव्र केली जाते. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरण्याची सूचना केली जाते; मात्र, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा थेट वीजपुरवठाच खंडित केला जातो. ही कारवाई तीव्र झाल्यामुळेच विक्रमी वसुली झाली आहे. ३१ मार्चअखेर जिल्ह्याला ९० कोटी १७ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. महावितरणच्या वसुली पथकाने १०० कोटी ३३ लाखांची १११.२७ टक्के विक्रमी वसुली झाली आहे.



