अशा लाल मातीतराजकीय

बाळ माने यांची उंची छलांग!

राज्याच्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांकडे उमेदवारांची रस्सीखेच सुरू आहे. सोबतीला बच्चू कडू, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीही जोर करत आहे, तर लाखोंची सभा गाजविणारे मराठा आंदोलनाचे जरांगे कोणती आघाडी उघडतात याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष आहे. त्यामुळे जरी वरवरचा हा सामना दुरंगी असला, तरी प्रत्यक्षात तो चौरंगी पटावर चालणार अशी शक्यता आहे.

यातील रत्नागिरी विधानसभेतील लढत नक्की कशी होईल याचा अंदाज अजून येऊ शकत नाही. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा गेली चार टर्म (२० वर्षे) उदय सामंत यांचा भक्कम बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ते मूळ शिवसेना आणि त्यानंतर थेट गोवाहाटीहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असा प्रवास करत राजकीय पटलावर सतत कार्यरत आणि सत्तेच्या परिघात असलेले ना. उदय सामंत यांना समोर लढणारा ताकदवर विरोधकच नाही, अशी परिस्थिती अगदी आचारसंहिता जाहीर झाल्यावरही आहे. त्यामुळे सामंत यांच्यासमोर उमेदवार कोण? असा प्रश्न प्रत्येकवेळी उपस्थित होतो.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नारायण राणे यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून १२ हजार कमी मते होती. या आकडेवारीनुसार सामंत यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. ही जागा मविआमध्ये उबाठाची, सहाजिकच तेथे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी इच्छूक उमेदवार म्हणून अर्जही दाखल केले आहेत. त्यातील सर्वाधिक शक्तिशाली उमेदवार म्हणून उदय बने यांच्या नावांची चर्चाही आहे. शिवसेनेतील राजकीय धुरंधर म्हणतात उदय बने यांनी मनापासून ठरवले, तर ते उदय सामंत यांना पराभूत करू शकतात! याचवेळी रत्नागिरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांनी ही इच्छा प्रकट करताना कोकणातून एक मुस्लिम जागा सोडावी अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. ना. शरद पवार यांच्या चिपळूण दौऱ्यात चिपळूणसोबत रत्नागिरी हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळावा अशा चर्चा झाल्या होत्या. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील २५ ते ३० टक्के मुस्लिम मतदारांचा विचार करता बशीर मुर्तुझा यांच्या उमेदवारीची शक्यता अखेरच्या क्षणी व्यक्त होत आहे.

आघाडी विरोधात महायुती अशा चर्चा सुरू असताना आणि प्रत्यक्ष अद्याप कोणाताच उमेदवार नक्की नाही आणि मतदारसंघात कार्यरत नाही अशी परिस्थिती असताना भाजपचे बाळ माने यांनी सामंत विरोधात निवडणुकीचे थेट आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना १२ हजार मते मायनस होती. त्यांचे सहकारी पक्ष आमदार उदय सामंत यांनीच जाणीवपूर्वक त्यांना पाडायचा प्रयत्न केला असा त्यांचा आक्षेप होता. यातूनच राणे विरोधात सामंत धुसफुस सुरू आहे. नितेश राणे यांच्या आक्रमक शैलीने त्याला थेट युध्दाचेच रूप आले आहे. उदय सामंत यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडून येऊ देणार नाही असाच जणू त्यांचा संकल्प आहे. यातूनच भाजप आणि आरएसएस स्टाईल हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचे अनेक प्रयत्न मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक आक्रोश मोर्चे झाले.

विजयादशमीच्या मिरवणुकीची सुरवातच कोकण नगरच्या उर्दू शाळेपासून सुरू करत नवा वाद तयार झाला. अत्यंत सलोख्याचे वातावरण असणारा कोकण आणि रत्नागिरी येथे धार्मिक तणाव तयार होतील असे वातावरण काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का? अशी शंका येणाऱ्या घटना गेल्या काही महिन्यांत होत आहेत. यांतील एक महत्त्वाची नोंद घेण्यासारखी आहे, ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मुस्लिम समाजाने आणि दलित समाजाने मतदान केले नाही. त्याचा राग अशा प्रकारे काढला जात नाही ना? अशी शंका येणाऱ्या घटना घडत आहेत. यातून या रत्नागिरी परिसरातील जातीय सलोखा धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होते. भाजपचा रत्नागिरी विधानसभेचे पारंपरिक उमेदवार आहेत बाळ माने. २० वर्षांपूर्वी बाळ माने हे या मतदारसंघाचे भाजपचे आमदार होते. मागील २० वर्षे उदय सामंत प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी बाळ माने यांचा ३ वेळा पराभव केला आहे. आज दोघेही महायुतीच्या आघाडीचे घटक आहेत.

बाळ माने यांनी सामंत यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी  ”अभी नही तो कभी नही” म्हणत गेल्या एक वर्षापासूनच सुरू केली आहे. महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना आणि त्यांचे विद्यमान आमदार उदय सामंत आहेत यामुळे येथे भाजपला थेट संधी मिळणार नाही याचा विचार करत बाळ माने आता दीर्घ उडी घेण्याच्या तयारीत आहेत. या लंबी छलांगचा त्यांनी मनसुबा जाहीरही केला आहे. भाजपचे निष्ठावंत असणारे माजी आमदार बाळ माने थेट शिवसेना उबाठामध्ये पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारणे ही मोठा राजकीय कसरत ठरणार आहे. बाळ माने हे हार्डकोअर भाजप कार्यकर्ते आहेत. आरएसएसच्या मुशीतून तयार झाले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे सेक्यूलर धोरण स्वीकारणे हे फार आव्हानात्मक ठरणार आहे; मात्र त्यांचे ठरले असल्याप्रमाणे सध्या राजकीय गाठी भेटी सुरू आहेत. मातोश्रीवरून त्यांना हिरवा कंदील मिळाल्याची खबरही फिरते आहे.

या निमिताने उंच उडीच्या जागतिक इतिहासाची पुनरावृत्ती या मतदारसंघात होण्याची संधी बाळ माने यांना मिळू शकते! ऑलिंपिक स्पर्धेत १९६० पर्यंत उंच उडीचा विक्रम अंजन विल्सन यांच्या नावावर होता. १.५७ मीटरची उंच उडी मारताना तो पाय पुढे करत पारंपरिक पद्धतीने उडी मारत असे. अनेक दशके त्याचा विक्रम होता. या पारंपरिक प्रस्थापित विक्रमाला १९६८ साली डिक फॅास्बर या ॲथलेटने मोडीत काढले. त्यांनी उंच उडी मारण्याची नवी पद्धत शोधून काढली आणि २.२४ मीटरची उंच उडीचा अभूतपूर्व जागतिक विक्रम केला. त्याच्या या पद्धतीला फॅास्बर फ्लॅाप असे त्याचेच नाव देण्यात आले. बाळ माने यांची उंची छलांग ही फॅास्बर फ्लॅाप होते का, हा निर्णय रत्नागिरीकरांच्या हाती!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button